आमची भ्रमंती - "सज्जनगड"

भ्रमंती, ट्रेकिंग, भटकंती असे शब्द कानावर पडण्याचा अवकाश की मी आणि आमच्या होम मिनिस्टर नेहमीच नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी तयारच असतो. लग्न झाल्यापासून ह्या पुण्यनगरी भोवतालची कित्येक ठिकाणे मी, हिच्या साथीने फिरलो आहे. आज पर्यंतच्या भ्रमंती मध्ये आम्हाला ह्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील कित्येक ठिकाणांच्या गौरवशाली आणि वैभवशाली  परंपरेला याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य लाभले. बरेचदा आमचे हे भ्रमंतीचे बेत अचानक ठरतात आणि लगेच पूर्ण सुद्धा होतात पण काही बेत ठरता ठरत नाहीत आणि ते पूर्ण होणे तर लांबचीच गोष्ट. तर काही बेत ठरतात तर लगेच; पण पूर्ण होणे नाही अशी स्थिती. असाच गेल्या कित्येक दिवस नव्हे तर महिन्यापासून आखलेला बेत म्हणजे समर्थ रामदासस्वामींच्या मंगल वास्तव्याने पावन झालेला "सज्जनगड". सज्जनगडाचा बेत कित्येक वेळा केला पण दर वेळी काही ना काही विघ्ने यायचीच. इतिहासाची पाने चाळल्यास आपल्याला सहज लक्षात येईल कि ह्या सज्जनगडावर कितीतरी आक्रमणे झाली आणि तो कित्येक साम्राज्यांच्या ताब्यात सहज गेला पण आमच्या बाबतीत काहीतरी खास असेच होते. कित्येक वेळा प्रयत्न करूनही आम्हाला समर्थ रामदासस्वामींनी "यांना इतक्या सहज दर्शन द्यायचेच नाही" असे ठरवले असावे. अक्षरशः एकदा तर आम्हाला सज्जनगडाच्या पायथ्याला जाऊन माघारी फिरावे लागले होते. पण शेवटी सर्व संकटांवर मात करून अगदी चिवटपणाने आम्ही हि सज्जनगडाची मोहीम यशस्वी केलीच. त्या बद्दलचाच आजचा हा विशेष लेख. 
महाराष्ट्र हि संतांची भूमी, आजची स्थिती कशीही असेल पण पुरातन काळापासूनच महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. ह्या मंगल भूमीत समर्थ रामदासस्वामी यांनी अद्वितीय असे कार्य करून ठेवले आहे. आपल्या सर्वांना रामदास स्वामींबद्दल माहिती असणारच आहे. जांब या गावी जन्मास आलेल्या ह्या चिमुरड्या मुलाने स्वतःच्या लग्न मंडपातून "शुभ लग्न सावधान" असे म्हणताच सावधपणे धूम ठोकली आणि रामदास स्वामींचा जन्म झाला, महाराष्ट्राला एक संत रत्नाची देणगीच मिळाली. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार रामदासस्वामी स्वराज्याच्या नवीन राजधानी ''अजिंक्यतारा'' ह्या साताऱ्यातील किल्ल्यापासून जवळ असलेल्या परळीच्या किल्ल्यावर कायमचे निवासी झाले आणि ह्या गडाचे नामकरण करण्यात आले "सज्जनगड". या ठिकाणी अगदी प्राचीनकाळी "आश्वलायन" ऋषींचे वास्तव्य होते म्हणून याला आश्वलायन गड असेही म्हणतात. तसेच गडावर आजही कित्येक अस्वले फिरत असतात म्हणून याला अस्वलगड असेही म्हणतात.

पुण्यापासून साधारणपणे 130 किमी दूर असे हे ठिकाण. कालच्या रविवारी सज्जनगडावर जायचेच असे ठरवून आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. कात्रजच्या नवीन बोगद्यातून पुढे मजल दरमजल करत मस्त अशा पुणे बेंगलोर हायवेवरून सुसाट सुटलो. पाऊस नुकताच येऊन गेल्यामुळे आकाश निरभ्र होते. पल्ला लांबचा असल्यामुळे वाटेत थोड थांबून आणि दुपारचे जेवण करून पुढे निघावे असे ठरवले. खंबाटकी घाट ओलांडून पुढे पाचवड गावात "श्री भगवती अन्नपूर्णा" हे खूप स्वच्छ आणि माफक दर असलेले हॉटेल आहे, इथे मस्त जेवण केले. पोटोबा भरला, त्यामुळे आता न थांबता सज्जनगड गाठावा असा विचार करून गाडीला किक मारली पण अचानक गाडीच्या पुढच्या चाकातून कसला तरी आवाज येऊ लागला आणि हा प्लान रद्द करावा लागतोय कि काय असा विचार मनात चमकून गेला. नशीब! जवळच फिटर होता, फक्त Speedometer ची वायर खराब झालेली, ती दुरुस्त होताच वेळ वाचवण्यासाठी सुसाट निघालो. सातारा शहरात पोहोचल्यावर अजिंक्यतारा या स्वराज्याच्या नव्या राजधानी पासून पुढे सज्जनगडाकडे निघालो, हे अंतर साधारणपणे 20 किमी आहे. साताऱ्यापासून वळणा वळणाचा रस्ता सुरु होतो. वाटेत छोटी मोठी गावं लागतात. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे आहेत. पाऊस-पाणी चांगले असल्यामुळे शेती चांगली पिकते. त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. गडाच्या पायथ्याला गजवाडी हे गाव आहे. या गावातून वर गडाकडे जाण्यासाठी घाट रस्ता आहे, याच रस्त्याने आम्ही वर निघालो. घाट चढत असताना निम्या अंतरावर गेल्यावर मुख्य रस्त्यापासून उजवीकडे एक रस्ता फुटतो तिथूनच आपल्याला सज्जनगडावर जाता येते. मुख्य रस्ता तसाच पुढे ठोसेघर धबधब्याकडे जातो.
गडावर पोहोचल्यावर पार्किग ची सोय आहे आणि तिथून पुढे मुख्य गडावर जाण्यासाठी साधारणपणे २५० पायऱ्याचा रस्ता आहे. या पायऱ्या चढ्या प्रकारातील नाहीत त्यामुळे कुणीही अगदी सहज गडावर जाऊ शकते. वृद्ध वयस्कर लोकांसाठी डोलीची सोय पण उपलब्ध आहे. पायऱ्या चढून जात असताना दोन दरवाजे लागतात, पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे म्हणतात तर दुसर्या दरवाजाला समर्थ द्वार असे म्हणतात. आम्ही फोटो काढत काढत गडावर साधारण ३ वाजता पोहोचलो.





गडावर गेल्या गेल्याच पाण्याने भरलेला तलाव आहे. पुढे मारुतीचे मंदिर आहे ज्यामध्ये बसून रामदासस्वामी रामनामाच्या गजरात तल्लीन व्हायचे. पुढे गोशाळा आणि संस्थेचे कार्यालय आहे. तिथून पुढे आल्यावर मुख्य मंदिर लागते. शेवटी आहे अशोक वाटिका आणि पुढे आहे रामदास स्वामींची समाधी. या मंदिरात तळघरात रामदासस्वामी यांची स्वयंभू समाधी आहे. या ठिकाणी एक खूप मोठा खड्डा होता. त्या मध्ये रामदास स्वामींचे देहावसान झाल्यावर अग्निसंस्कार झालेले, याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी सुंदर असे देऊळ उभारले. समाधी मंदिराच्या वर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. या मूर्तीं एका अंध कारागीराने घडवल्या. या ठिकाणी एक विलक्षण घडलेली घटना सांगावीशी वाटते. रामदास स्वामींच्या आदेशानुसार ज्यावेळी स्वामींचे शिष्य त्या अंध कारागीराकडे मूर्ती घडवायला गेले त्यावेळी त्याने डोळे नसल्यामुळे मूर्ती घडवण्यास नकार दिला; तेंव्हा प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांनी त्या कारागिराला स्वप्नात येऊन दर्शन दिले. प्रत्यक्ष देवानेच हा पेच प्रसंग सोडवला, मग डोळे नसतानाही प्रत्यक्ष राम दर्शन झाल्यामुळे त्या कारागीराने या अत्यंत देखण्या, भरीव मूर्ती घडवल्या. त्यामुळे सज्जनगडावरील या मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामाचे खरे प्रतिबिंबच जणू. आम्ही गेलो तेंव्हा रविवार असून सुद्धा उशीर झाल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही दोघे थोड्यावेळ तेथील गर्भगृहात बसलो आणि अजून काही, 'न भूतो न भविष्यती' अशा काही दैवी गोष्टी बघण्यास निघालो.



समाधी मंदिराच्या बाहेरच रामदास स्वामींचा मठ आहे. या मध्ये रामदास स्वामींच्या रोजच्या वापरातील काही गोष्टी जतन करून ठेवल्यात. या मध्ये कित्येक दैवी गोष्टी आहेत. जसे कि रामदास स्वामींना प्रत्यक्ष हनुमानाने दिलेले वल्कले तसेच गुरुदेव दत्तात्रेय यांनी दिलेली कुबडी, या कुबडी मध्ये हातभर लांब अशी धारदार तलवार आहे. तसेच या मठात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी समर्थांना भेट म्हणून दिलेला पलंग आहे. समर्थांचे यज्ञ कुंड, पिकदाणी, राम मूर्तींचा लाकडी कट्टा, तसेच अजूनही बऱ्याच वस्तू या ठिकाणी जतन करून ठेवल्यात. या सर्वांचे दर्शन घेऊन आम्ही भारावून गेलो. या ठिकाणी असलेली अजून एक अद्भुत वस्तू म्हणजे कल्याणस्वामींचे प्रचंड हंडे. एक हंडा म्हणजे आपला प्लास्टिकचा १०० लिटरचा ड्रम सहज भरेल. असे दोन हंडे घेऊन कल्याणस्वामी उरमोडी नदीतून प्यायला पाणी रोज घेऊन येत असत. हंड्यांचा आकार बघून मी हबकलोच. हंड्यांच्या आकारावरून समर्थांनी बलोपासनेचे सांगितलेले महत्व, त्यांनी राष्ट्र बळकटीसाठी स्थापन केलेले ११ मारुती आणि सर्व समर्थ शिष्यांच्या ताकदीची थोडीशी कल्पना आली.



मुख्य मंदिराच्या मागे समर्थ स्थापित धाब्याच्या मारुतीचे मंदिर तसेच ब्रम्हपिसा स्मारक आहे. या मंदिरांचे दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो, मंदिराच्या मागील परिसर अत्यंत नयनरम्य आहे. डोंगराच्या एका टोकाला धाब्याचा मारुती तर दुसर्या टोकाला उरमोडी धरण आहे. संपूर्ण गडाच्या सुरक्षिततेसाठी समर्थांनी या मारुतीची स्थापना केली होती. या ठिकाणी फोटोग्राफी साठी अत्यंत सुंदर वातावरण आहे. श्रीरामदास स्वामी संस्थानाच्या मार्फत आज या गडावर बरीच कामे केली आहेत या मध्ये प्रामुख्याने आहे ते गडावर राहण्याची तसेच २४ तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. गडावरील आणि आसपासचे वातावरण अत्यंत प्रसन्न आणि आल्हाददायक आहे. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणी सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूर्ण सज्जनगड आणि परिसरावर हिरवागार गालीचा अंथरल्या सारखे वाटते.









हा सर्व परिसर आम्ही डोळ्यात साठवून ठेवत होतो. गडावर फिरताना परतू नयेच असे वाटत होते. कितीही वेळ या ठिकाणी थांबलो तरीही आमचा पाय निघत नव्हता. पण अचानक ठोसेघर धबधब्याकडे जाण्याचा प्लान डोक्यात आला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. माघारी जाताना अशोक वाटिका, तसेच किल्यावर असलेले अजून दोन तलाव पहिले. एका तलावात तर आम्हाला कित्येक कासवे आणि मासे पोहोताना दिसली.

मग आम्ही साधारणपणे साडेचारला गड उतार झालो. गडावर अजूनही कित्येक गोष्टी बघण्यासारख्या आहेत जसे कि कल्याणस्वामी कडा, अंगलाई देवी मंदिर इत्यादी. सज्जनगडाबद्दल कितीही लिहावे ते कमीच आहे.
सज्जनगडावर आलो आणि ठोसेघर धबधबा बघितला नाही असे होऊच शकत नाही; आणि हे अंतर सुद्धा अगदी 20 किमी च्या अंतरामध्ये आहे. मग साहजिकच आमची गाडी ठोसेघर कडे वळली. ठोसेघर धबधब्या विषयी आता पुढील लेखात सविस्तरपणे लिहीन.
धबधबा बघून आम्ही ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागलो. बराच उशीर झालेला. रस्त्यानेही खूप शेतकरी आपापल्या गाई-म्हशी आणि जनावरे घेऊन घरी परतत होती त्यामुळे रस्त्याने वेगाने जाता येत नव्हते. अंधारामुळे घरी यायला रात्रीचे १० वाजले. घरी परतताना पुढल्या मोहिमेचे बेत डोक्यात शिजत होते पण मन मात्र कधीच समर्थ चरणी लीन झालेले.

रामदरा

ऐन पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाच्या सरींवर सरी बरसत आहेत, सगळा निसर्ग ह्या वरुणराजाच्या कृपाशीर्वादाने तृप्त झाला आहे आणि अशा ह्या वातावरणात जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जावेसे वाटले तर टू व्हीलर काढायची आणि सुसाट निघायचे निसर्गाच्या कुशीत. त्याही दिवशी काहीसे असेच वातावरण होते, आभाळ भरून आले होते आणि आता आज कुठे जायचे याचा विचार चालू होता. काही केल्या ठिकाण ठरेना आणि वेळ तर असाच जात होता. मग अचानक एक ठिकाण आठवले आणि आम्ही लगेच निघालो. तसा निघायला आम्हाला बराच उशीर झालेला पण हे अगदी खासच ठिकाण आहे; पुण्यापासून अगदी जवळ.
चहूकडे हिरवळ, घनदाट झाडी, बाजूनेच सतत वाहणारा कालवा आणि तीन बाजूंनी डोंगराच्या कुशीत वसलेले हे ठिकाण म्हणजे "रामदरा"
 पुण्यापासून रामदरा खूपच जवळ आहे. रामदरा हे ठिकाण पुण्यापासून साधारणपणे ३० ते ३५ किमी अंतरावर लोणी काळभोर ह्या गावापासून जवळ आहे. आम्ही साधारणपणे दुपारी 1 वाजता घरून निघालो. सकाळपासून आभाळ भरून आल्यामुळे मूड जरा खराब होता आणि रामधरा ठिकाण अनोळखी असल्यामुळे मनात थोडीशी शंका होती कि हे ठिकाण कसं असेल. पुणे सोलापूर रस्त्याने सरळ काही अंतर गेल्यावर लोणी काळभोर हे गाव आहे. ह्या गावाकडे गाडी वळवली आणि रस्ता शोधत शोधत पुढे जाऊ लागलो. पुण्यातील गोंगाटा पासून अचानक मुक्ती मिळाली आणि मन हळूहळू प्रसन्न होऊ लागले. काही अंतर पुढे गेल्यावर वळणा वळणाचा रस्ता सुरु झाला आणि सिमेंटच्या जंगलांची जागा आता हिरवळीने घेतली. चहूकडे हिरवळ आणि हिरवीगार शेते लक्ष्य वेधून घेत होती. मधेच एखादे कौलारू घरटे आणि रस्त्याच्या कडेने निघालेले जनावरांचे कळप. थोड्याच अंतरावर झाडांची गर्दी दिसली आणि मंदिराचे कळस डोकावले. हेच ते रामदरा मंदिर. इथे बरीच नारळाची झाडे आहेत जी खूप दुरूनच दिसतात.


मंदिराच्या परिसरात जायला गेट मधून आत गेलो आणि गाडी पार्किंगला लावून मंदिराकडे निघालो. मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता तसेच दत्तात्रेय आणि शंकराची पिंड आहे. मंदिराचे सुशोभीकरण सध्या चालू आहे. त्यामध्ये मार्बल फ्लोअर आणि इतर काम चालू आहे. हे संपूर्ण मंदिर कृत्रिम तलावाने वेढलेले आहे. मुबलक पाण्यामुळे ह्या तलावात बाराही महिने पाणी असते. ह्या तलावात खूप रंगीबेरंगी बदके पोहत असतात. मंदिराच्या सभोवती वनखात्याने सुंदर विकासकामे केलेली आहेत. कित्येक प्राणी आणि पक्ष्यांची शिल्पे आणि माहितीपूर्ण बोर्ड ठिकठिकाणी लावले आहेत.



सर्व परिसर अत्यंत सुखावह आणि निसर्गरम्य आहे. रामदरा येथे आल्यावर सगळा थकवा दूर झाला आणि मूड एकदम बदलून गेला. आम्ही परिसराचे बरेच फोटो काढले आणि तिथल्या बागेत निवांत वेळ घालवला. ह्या बागेत वडाची आणि अशोकाची बरीच झाडे आहेत. एकूणच सर्व परिसर हिरवागार आहे.




संपूर्ण परिसर फिरायला साधारणपणे अर्धा ते एक तास पुरेसा आहे. मंदिर परिसर धार्मिक आहे, पण ह्या वातावरणात बऱ्याच ठिकाणी वयात आलेली मुलं मुली एकमेकांबरोबर नको ते चाळे करताना सर्रास दिसतील. कुटुंबातील थोरामोठ्यां बरोबर आलेल्या लहान लेकरांच्या पुढेच त्यांचे हे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे रामदरा इथे जाताना शक्यतो सकाळीच जावे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची हि कर्तृत्ववान भावी पिढी त्यावेळी साखरझोपेत असेल.


रामदरा या ठिकाणी खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. इथे काही स्थानिक लोकांनी छोट्याश्या झोपडीमध्ये दोन चुलींवर गरमागरम जेवण देण्याची सोय केली आहे. इथे चुलीवरची पिठलं भाकरी आणि कांदा, तसेच चविष्ट भजी, चहा इत्यादी गोष्टी मिळतात. दर्शन होऊन संपूर्ण परिसर फिरून झाल्यामुळे मग आम्ही सुद्धा इथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. चुलीवरील भजी तर अप्रतिम होती. मंदिराबाहेर स्थानिक भाजी विक्रेते ताजी भाजी घेऊन बसले होते तेथून आम्ही भाजी घेतली आणि पुण्याकडे प्रस्थान केले परत एकदा माणसांच्या गर्दीत मिसळण्यासाठी.