निसर्गाच्या कुशीत वसलेले बनेश्वर , Baneshwar Pune

आमच्या भ्रमंती मध्ये आज आपण भेट देणार आहोत एका निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि शंभू महादेवाच्या वास्तव्याने पावन झालेल्या एका तीर्थाला. पुणे सातारा हायवेवर हाकेच्या अंतरावर नसरापूर हे गाव आहे. या गावामध्ये आहे बनेश्वर हे शंकराचे आद्य तीर्थ. बनेश्वर मंदिराचे पुण्यापासुनचे अंतर आहे अवघे ३६ किलोमीटर. बनेश्वरला जायचे ते म्हणजे दोन गोष्टी बघण्यासाठी, एक म्हणजे प्रसिध्द शिवमंदिर आणि दुसरे म्हणजे येथील धबधबा.




बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची स्थापना चालुक्य राजांच्या काळात झाली असे म्हणतात. पुढे छत्रपती श्री शाहूमहाराज यांच्या दरबारी असणारे पेशवे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ह्यांनी १७४९ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचे पटांगण विशाल आहे. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा ह्यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. मंदिराला चहुबाजूंनी सौरक्षण भिंत आहे. आतील आवारात अनेक लहान लहान मंदिरे आहेत.


या मंदिरातील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलकुंडे. नैसर्गिक अशी तीन जलकुंडे आपल्याला बघायला मिळतात. या मध्ये खूप सारे मासे आणि कासवे पोहत असतात. जुन्या काळी याच कुंडांमधील पाण्याने ऋषीमुनी महादेवाचा अभिषेक करायचे आणि घनदाट झाडीत तपश्चर्या करायचे.

पुरातन काळी हा सर्व परिसर घनदाट जंगलाने व्यापला होता, आणि म्हणूनच बन किंवा वन ह्यांचा ईश्वर म्हणून या शिवमंदिराला बनेश्वर हे नाव पडले. आजही मंदिराच्या आसपास अतिशय गर्द झाडी आहे त्यामुळे येथे वनविभागाने उद्यानाची रचना केली आहे. हे उद्यान संरक्षित असून संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत बघण्यासाठी खुले असते. असंख्य प्रकारची झाडे येथे आपले स्वागत करतात. वनविभागाने या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी झोके cisaw ठेवले आहेत. तसेच तरुणांसाठी सुद्धा साहसी खेळ या ठिकाणी आहेत.

याच उद्यानातून आपण बनेश्वर येथील प्रसिद्ध धबधब्याकडे जाऊ शकतो. धबधबा बघण्यासाठी वनविभागाने एका उंच मचाणाची सोय केली आहे. पावसाळ्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. येथे पावसाळ्यात आल्यास तुम्ही जणू स्वर्गातच आला आहात असेच वाटेल. या ठिकाणी निसर्ग जणू हिरवी शाल पांघरतो आणि आकाशातून पडणारे पावसाचे थेंब तुम्हाला अंतर्बाह्य भिजवून टाकतात. सर्व परिसर , शेजारील डोंगर हे हिरवेगार होऊन आपल्याला मंत्रमुग्ध करतात.


अशा या निसर्गरम्य आणि तपस्वींच्या भूमीला आपण एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद!.


आमची भ्रमंती - अद्भुत रहस्यमयी तरीही तितकाच सुंदर असा अमेर फोर्ट जयपूर राजस्थान (Amer Fort Rajasthan)

नमस्कार, आज आपण माहिती घेणार आहोत राजस्थान ची राजधानी जयपूर मधील आमेर ह्या किल्ल्याची. तुम्ही राजस्थानात आला आहात आणि आमेर किल्ल्याला भेट दिली नाही असे होऊच शकत नाही. जयपूर मधले सर्वात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ कोणते असेल तर ते म्हणजे आमेर फोर्ट. ह्या किल्ल्याला अंबर फोर्ट असेही म्हणतात. 






इतिहासाची पाने चाळल्यास आपणास दिसून येते की आमेर फोर्ट आणि आसपासच्या भागावर मीणा ह्या मूळ लोकांचे साम्राज्य होते परंतु राजस्थानातील राजपूत राजांनी ह्या भागावर आक्रमण केले आणि जयपूर आणि हा किल्ला आपल्या ताब्या मध्ये घेतला.,ह्याच राजपूत राजापैकी एक असलेले राजा मानसिंह, मिर्झाराजे जयसिंह तसेच सवाई जयसिंह यांच्याद्वारे ह्या किल्लाचे निर्माण केले गेले. हे राज घराणे म्हणजेच प्रत्यक्ष रामाचे वंशज आहेत. रामरायाचे तीनशे आठवे वंशज म्हणजेच हे जयपूरचे प्रसिद्ध राजघराणे होय. ह्या किल्ल्याला तयार करण्यासाठी साधारणपणे दोनशे वर्षांचा कालावधी लागला. किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याची रचना. हा संपूर्ण किल्ला लाल दगडांमधून किंवा आपण ज्याला मार्बल स्टोन म्हणतो अशा दगडातून निर्माण केलेला आहे हा किल्ला बघण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. हा किल्ला जयपुर शहरापासून साधारणपणे अकरा किलोमीटर दूर आहे. ह्या किल्ल्यामध्ये विविध प्रकारचे महल तसेच बाग-बगीचे आहेत. अत्यंत नयनरम्य बगीचांचे निर्माण त्या काळी करून ह्या किल्ल्याची शोभा वाढवण्यात आली आहे. इथे दोन बगीचे आहेत, एक किल्ल्याच्या पायथ्याला तर दुसरा मुख्य किल्ल्यामध्ये. गडाच्या पायथ्याला भव्य सरोवराची निर्मिती करण्यात आली ज्याला मावठा सरोवर म्हणतात, याच तलावातून गडावर पाण्याची सोय करण्यात आली आहे. ह्या तलावाचे वैशिठ्य म्हणजे ह्यामध्ये पडणारे किल्ल्याचे प्रतिबिंब. 

राजपूत राजे हे देवीचे भक्त होते, ते अंबा मातेचे उपासक होते, याच अंबा मातेवरून ह्या किल्ल्याला अंबर फोर्ट असेहि म्हणतात. आमेर फोर्ट मधील सर्वात महत्वाचे मंदिर म्हणजे शीला माता मंदिर. ह्या शीला माता मंदिराची कहाणी खूपच रोचक आहे. असे म्हणतात की एका युद्धाच्या वेळेस राजा मानसिंह यांना बंगालमधील एका राजाने पराजित झाल्यानंतर संपूर्ण राज्याच्या बदल्यात ही शीला भेट म्हणून दिली. हि शीला साधारण शीला नाही हे राजा मानसिंह ह्यांना निश्चितच माहित होते. ते हि शीला म्हणजेच दगड घेऊन जयपूरला आले. सुरुवातीला ही शीलामाता दगडाच्या स्वरूपामध्ये होती परंतु कारागिरांनी दगडातून एक सुंदर देवीची मूर्ती घडवली आणि तिची प्रतिष्ठापना या किल्ल्यामध्ये केली गेली हीच शीला माता म्हणून ओळखली गेली. हीच शीला माता या संपूर्ण किल्ल्याचे तसेच संपूर्ण जयपूरचे रक्षण करते. शीला मातेला जयपूर चे कुल दैवत मानले जाते. 





ह्या किल्ल्यावर फिरताना आपल्याला दिसतात दिवाने आम, दिवाण-ए-खास तसेच शीश महाल. हे सर्व महाल खूपच विलोभनीय आहेत. किल्ल्यामधे स्वच्छता गृह, पाकगृघ तसेच नाहाणीगृह हे सर्व आजही चांगल्या स्थितीत आपणास बघायला मिळतात. यामधील शिश महालामध्ये लाखोंच्या संख्येने छोटे-छोटे आरसे संपूर्ण भिंतींना आणि छताला चिटकवलेले आहेत, रात्रीच्या वेळेस एखाद्या पणतीच्या उजेडात संपूर्ण शीश महल उजळून निघतो जणू या ठिकाणी लाखो तारे चमचम करत असतात असे दृश्य दिसते. हे दृश्य बघण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक आमेर किल्ल्याला भेट देत असतात. 




आमेर किल्ल्याच्या थोड्याशाच वरच्या डोंगरावर अजून एक किल्ला आपले लक्ष्य वेधवून घेतो तो किल्ला म्हणजे जयगड किल्ला. हा जयगड किल्ला म्हणजे दारुगोळा शस्त्रसाठा यांचे आगार. युद्धाच्या वेळेस सैनिक जयगड किल्ल्यांमध्ये दबा धरून बसलेले असायचे आणि याच जयगड किल्ल्यावरून संपूर्ण परिसराचे संरक्षण केले जाई. आमेर किल्ल्यावरुन जयगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक अत्यंत गुप्त मार्ग असून हा मार्ग पर्यटकांसाठी आजही खुला आहे. याच गुप्त मार्गाने पर्यटक आजही एका किल्ल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर जातात, हा साधारणपणे दोन किलोमीटरचा गुप्त मार्ग आहे जो कि जमिनीखालून जातो. 

आमीर किल्ल्यावर जाण्यासाठी जयपुर मधून रिक्षा टॅक्सी तसेच बसेस ची सोय आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी भव्य पायऱ्या आहेत, पर्यटक हत्तीवर बसू सुद्धा फोर्ट वर जाऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त जयपुर मध्येच नाही तर संपूर्ण राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही प्रेक्षणीय स्थळे अत्यंत माफक दरात बघण्यासाठी उपलब्ध आहेत. 

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!

आमची भ्रमंती - शिवकालीन ऐतिहासिक गाव- पाटलांचे रांझे (Ranje Village, Patlanche Ranje)

आजचा आमची भ्रमंती चा लेख लिहिताना मला विशेष आनंद होतो आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. एकतर आज खूप दिवसांनी भ्रमंतीचा योग आला आणि त्यात ती भ्रमंती झाली ती सुद्धा शिवकालीन ऐतिहासिक गावामध्ये. आज मी; आपल्याला फिरायला जायचे आहे एवढेच होम मिनिस्टरानां सांगतीले होते पण कोणते ठिकाण हे मात्र सांगायचे नाही असे ठरवले होते, त्यामुळे अनेकदा विचारून ही मी काहीच सांगत नाही हे पाहून कोणते तरी विशेष ठिकाण असणार हे तिच्या लक्षात आले. पुणे सातारा रस्त्यावर महामार्गाच्या दिशेने गाडी वळवली आणि गंमत म्हणून आपण आज बनेश्वरला जात आहोत असे सांगितले.
पण जेंव्हा गाडी कात्रज बोगदा ओलांडून शिवापुर - कोंढणपुर गावाकडे उजव्या दिशेला वळली तेंव्हा तिला लक्षात आले की आपण आज नवीन ठिकाणी भ्रमंतीला जात आहोत.
खरंतर आजचा बेत माझ्या डोक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून शिजत होता आणि त्याला कारण होते आमचे मित्र प्राध्यापक राजकुमार देशमुख सर. मागील महिन्या मध्ये देशमुख सर त्यांच्या पुरातत्व संशोधन ग्रुप बरोबर शिवकालीन जलस्त्रोतांच्या संशोधनासाठी या ठिकाणी गेले होते. त्यांच्या कडूनच मला या ठिकाणची माहिती मिळाली. खरे तर देशमुख सरांबद्दल बोलावे लिहावे तेव्हढे कमीच आहे. माझे हे मित्र म्हणजे अगदी आदर्श व्यक्तिमत्त्व, तांत्रिक, भौगोलिक, ऐतिहासिक, शिवकालीन इतिहास या सर्वांबद्दल प्रेम जिव्हाळा असणारा जाणता माणूस. सरांबद्दल नंतर एक विशेष लेख मी लिहिनच तेंव्हा आपण त्यांच्या बद्दल अजून जाणून घेऊयात. तर सरांनी सांगितलेले ते ठिकाण म्हणजे पाटलांचे रांझे गाव. याच ऐतिहासिक गावामध्ये जुन्या काळात पाटलाने गावातील एका मुलीला पळवून अत्याचार केला आणि भीतीने सर्व गावकरी मूग गिळून गप्प बसले. शिवरायांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी त्या पाटलाला शिताफीने पकडून आणले आणि त्याच्यावर खटला चालवून त्याचे हात पाय तोडले.
या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले पुरातन शिव मंदिर. याच शिव मंदिराला भेट देण्याचा बेत आज आखला होता. गावात पोहोचल्यावर रहदारी काहीच जाणवली नाही. बहुतेक सर्व लोक आपापल्या कामात किंवा शेतात गेले असावेत. एका घराबाहेर दोन तीन शाळेतील मुले थांबली होती त्यांना शंकराच्या मंदिराबद्दल विचारले. मंदिर गावातच अगदी जवळ होते. एका मोठ्या वाड्याला लागून असे हे मंदिर थोड्याशा खोलीत बांधलेले आहे. आतला सर्व परिसर भव्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इथे असलेली शांतता, घनदाट झाडी आणि स्वच्छ वातावरण. त्या काळात या मंदिराला चहू बाजूने तटबंदी असावी पण आज तिची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मुख्य मंदिर मात्र सुस्थितीत आहे. आता या ठिकाणी बघायचे मुख्य आकर्षण आणि ते म्हणजे येथे असलेली तीन शिवकालीन जलकुंडे. या जलकुंभाचे वैशिष्ट्य म्हणजे यांची अंतर्गत रचना.



असे म्हणतात की ही जलकुंडे अंतर्गतपणे जोडली गेलेली आहेत पण प्रत्येक कुंडात पाणी जाताना त्याचा रंग वेगळा आहे आणि पाणी शुद्ध होऊन पुढील कुंडात जाते. आम्हाला प्रत्येक कुंडात खूप सारे मासे आढळून आले. पहिले जलकुंड हे कपडे धुण्यासाठी वापरले जाते, दुसरे जलकुंड हे आंघोळी साठी वापरतात या दोन्हीचे पाणी गर्द निळे आहे, आणि तिसरे जलकुंड हे देवाच्या अभिषेक आणि स्नानासाठी वापरतात की ज्याचे पाणी हिरवे असून या मध्ये खूप बेडूक दिसून आले. पण पहिल्या दोन कुंडात एकही बेडूक दिसला नाही.







या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी निचरा होण्यासाठी केलेली योजना. इथे प्रत्येक ठिकाणी अंतर्गत गटारांची साखळी तयार केली आहे आणि जमिनीवर कोठेही पाणी पडल्यास जागोजागी दगडांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून दिली आहे. अशा प्रकारचे जलव्यवस्थापन हे फारच दुर्मिळ असून शिवरायांच्या कर्तृत्वाबरोबरच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याची चुणूक आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.






आम्ही आलो त्या वेळी मुख्य मंदिराला कुलूप लावले होते त्यामुळे आम्ही प्रथम मंदिर परिसर फिरून बघितला, भरली वांग्याची भाजी आणि भाकरीची शिदोरी बरोबर होतीच त्यावर ताव मारला. आता पुढे काय हा प्रश्न सुचू देत नव्हता, आणि इतक्या लांब येऊनही दर्शन झाले नाही असे वाटू लागले. तितक्यात होम मिनिस्टर यांनी हा प्रश्न सोडवण्याचे कबूल केले आणि त्या मंदिराची किल्ली कोणाकडे ठेवतात ते बघायला गेल्या. तोपर्यंत मी माझे छायाचित्रे घेण्याचे काम करू लागलो.
या मंदिरामध्ये मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूस उंचीवर अजून दोन मंदिरे आहेत, तिथे जाऊन बघितले तर ही मंदिरे सुद्धा शंकरचीच होती. त्यातील एक मंदिर पूर्णपणे भग्नावस्थेत होते. यातील पिंड मात्र मुख्य मंदिरापेक्षा उंचीने मोठी होती. मंदिर परिसर अत्यंत आल्हाददायक आहे, आपल्याला अगदी एखाद्या हिरव्यागार पर्यटन स्थळी आल्यासारखा फील येतो. माझी फोटोग्राफी होई पर्यंत मंदिराची देखभाल करणाऱ्यानां होम मिनिस्टर घेऊन आल्या. शंकराचे दर्शन घेतले आणि त्या घाग मावशींकडून मंदिराची अजून माहिती घेतली. आजही गावातील पुरुष माणसे याच कुंडात रोज अंघोळीसाठी येतात तसेच गावातील बायका कपडे धुण्यासाठी येतात ही माहितीही मिळाली. दुष्काळात सुद्धा या तीन कुंडातील पाणी कधी कमी झालेले नाही.
खरेच आहे, जुने ते सोने म्हणतात ते उगीच नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आपण आजकाल आधुनिकतेच्या पाठीमागे हात धुवून लागलेलो आहोत पण जसे कितीही छान दिसले तरी कचकड्याचे खेळणे हे तकलादू असते त्याला लाकडी खेळण्याची सर येऊ शकत नाही तसेच पुरातन वास्तू, पुरातन कला, परंपरा, जीवन जगण्याची पद्धत आणि माणुसकी ही शंभर नंबरी सोन्याप्रमाणे असतात आणि हाच विचार मनात रुजवून आमचे मन शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले.

Tags - Ranje Village, Patlanche Ranje, Ranze

आमची भ्रमंती - "सज्जनगड"

भ्रमंती, ट्रेकिंग, भटकंती असे शब्द कानावर पडण्याचा अवकाश की मी आणि आमच्या होम मिनिस्टर नेहमीच नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी तयारच असतो. लग्न झाल्यापासून ह्या पुण्यनगरी भोवतालची कित्येक ठिकाणे मी, हिच्या साथीने फिरलो आहे. आज पर्यंतच्या भ्रमंती मध्ये आम्हाला ह्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील कित्येक ठिकाणांच्या गौरवशाली आणि वैभवशाली  परंपरेला याची देही याची डोळा बघण्याचे भाग्य लाभले. बरेचदा आमचे हे भ्रमंतीचे बेत अचानक ठरतात आणि लगेच पूर्ण सुद्धा होतात पण काही बेत ठरता ठरत नाहीत आणि ते पूर्ण होणे तर लांबचीच गोष्ट. तर काही बेत ठरतात तर लगेच; पण पूर्ण होणे नाही अशी स्थिती. असाच गेल्या कित्येक दिवस नव्हे तर महिन्यापासून आखलेला बेत म्हणजे समर्थ रामदासस्वामींच्या मंगल वास्तव्याने पावन झालेला "सज्जनगड". सज्जनगडाचा बेत कित्येक वेळा केला पण दर वेळी काही ना काही विघ्ने यायचीच. इतिहासाची पाने चाळल्यास आपल्याला सहज लक्षात येईल कि ह्या सज्जनगडावर कितीतरी आक्रमणे झाली आणि तो कित्येक साम्राज्यांच्या ताब्यात सहज गेला पण आमच्या बाबतीत काहीतरी खास असेच होते. कित्येक वेळा प्रयत्न करूनही आम्हाला समर्थ रामदासस्वामींनी "यांना इतक्या सहज दर्शन द्यायचेच नाही" असे ठरवले असावे. अक्षरशः एकदा तर आम्हाला सज्जनगडाच्या पायथ्याला जाऊन माघारी फिरावे लागले होते. पण शेवटी सर्व संकटांवर मात करून अगदी चिवटपणाने आम्ही हि सज्जनगडाची मोहीम यशस्वी केलीच. त्या बद्दलचाच आजचा हा विशेष लेख. 
महाराष्ट्र हि संतांची भूमी, आजची स्थिती कशीही असेल पण पुरातन काळापासूनच महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. ह्या मंगल भूमीत समर्थ रामदासस्वामी यांनी अद्वितीय असे कार्य करून ठेवले आहे. आपल्या सर्वांना रामदास स्वामींबद्दल माहिती असणारच आहे. जांब या गावी जन्मास आलेल्या ह्या चिमुरड्या मुलाने स्वतःच्या लग्न मंडपातून "शुभ लग्न सावधान" असे म्हणताच सावधपणे धूम ठोकली आणि रामदास स्वामींचा जन्म झाला, महाराष्ट्राला एक संत रत्नाची देणगीच मिळाली. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार रामदासस्वामी स्वराज्याच्या नवीन राजधानी ''अजिंक्यतारा'' ह्या साताऱ्यातील किल्ल्यापासून जवळ असलेल्या परळीच्या किल्ल्यावर कायमचे निवासी झाले आणि ह्या गडाचे नामकरण करण्यात आले "सज्जनगड". या ठिकाणी अगदी प्राचीनकाळी "आश्वलायन" ऋषींचे वास्तव्य होते म्हणून याला आश्वलायन गड असेही म्हणतात. तसेच गडावर आजही कित्येक अस्वले फिरत असतात म्हणून याला अस्वलगड असेही म्हणतात.

पुण्यापासून साधारणपणे 130 किमी दूर असे हे ठिकाण. कालच्या रविवारी सज्जनगडावर जायचेच असे ठरवून आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. कात्रजच्या नवीन बोगद्यातून पुढे मजल दरमजल करत मस्त अशा पुणे बेंगलोर हायवेवरून सुसाट सुटलो. पाऊस नुकताच येऊन गेल्यामुळे आकाश निरभ्र होते. पल्ला लांबचा असल्यामुळे वाटेत थोड थांबून आणि दुपारचे जेवण करून पुढे निघावे असे ठरवले. खंबाटकी घाट ओलांडून पुढे पाचवड गावात "श्री भगवती अन्नपूर्णा" हे खूप स्वच्छ आणि माफक दर असलेले हॉटेल आहे, इथे मस्त जेवण केले. पोटोबा भरला, त्यामुळे आता न थांबता सज्जनगड गाठावा असा विचार करून गाडीला किक मारली पण अचानक गाडीच्या पुढच्या चाकातून कसला तरी आवाज येऊ लागला आणि हा प्लान रद्द करावा लागतोय कि काय असा विचार मनात चमकून गेला. नशीब! जवळच फिटर होता, फक्त Speedometer ची वायर खराब झालेली, ती दुरुस्त होताच वेळ वाचवण्यासाठी सुसाट निघालो. सातारा शहरात पोहोचल्यावर अजिंक्यतारा या स्वराज्याच्या नव्या राजधानी पासून पुढे सज्जनगडाकडे निघालो, हे अंतर साधारणपणे 20 किमी आहे. साताऱ्यापासून वळणा वळणाचा रस्ता सुरु होतो. वाटेत छोटी मोठी गावं लागतात. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे आहेत. पाऊस-पाणी चांगले असल्यामुळे शेती चांगली पिकते. त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. गडाच्या पायथ्याला गजवाडी हे गाव आहे. या गावातून वर गडाकडे जाण्यासाठी घाट रस्ता आहे, याच रस्त्याने आम्ही वर निघालो. घाट चढत असताना निम्या अंतरावर गेल्यावर मुख्य रस्त्यापासून उजवीकडे एक रस्ता फुटतो तिथूनच आपल्याला सज्जनगडावर जाता येते. मुख्य रस्ता तसाच पुढे ठोसेघर धबधब्याकडे जातो.
गडावर पोहोचल्यावर पार्किग ची सोय आहे आणि तिथून पुढे मुख्य गडावर जाण्यासाठी साधारणपणे २५० पायऱ्याचा रस्ता आहे. या पायऱ्या चढ्या प्रकारातील नाहीत त्यामुळे कुणीही अगदी सहज गडावर जाऊ शकते. वृद्ध वयस्कर लोकांसाठी डोलीची सोय पण उपलब्ध आहे. पायऱ्या चढून जात असताना दोन दरवाजे लागतात, पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे म्हणतात तर दुसर्या दरवाजाला समर्थ द्वार असे म्हणतात. आम्ही फोटो काढत काढत गडावर साधारण ३ वाजता पोहोचलो.





गडावर गेल्या गेल्याच पाण्याने भरलेला तलाव आहे. पुढे मारुतीचे मंदिर आहे ज्यामध्ये बसून रामदासस्वामी रामनामाच्या गजरात तल्लीन व्हायचे. पुढे गोशाळा आणि संस्थेचे कार्यालय आहे. तिथून पुढे आल्यावर मुख्य मंदिर लागते. शेवटी आहे अशोक वाटिका आणि पुढे आहे रामदास स्वामींची समाधी. या मंदिरात तळघरात रामदासस्वामी यांची स्वयंभू समाधी आहे. या ठिकाणी एक खूप मोठा खड्डा होता. त्या मध्ये रामदास स्वामींचे देहावसान झाल्यावर अग्निसंस्कार झालेले, याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी सुंदर असे देऊळ उभारले. समाधी मंदिराच्या वर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. या मूर्तीं एका अंध कारागीराने घडवल्या. या ठिकाणी एक विलक्षण घडलेली घटना सांगावीशी वाटते. रामदास स्वामींच्या आदेशानुसार ज्यावेळी स्वामींचे शिष्य त्या अंध कारागीराकडे मूर्ती घडवायला गेले त्यावेळी त्याने डोळे नसल्यामुळे मूर्ती घडवण्यास नकार दिला; तेंव्हा प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांनी त्या कारागिराला स्वप्नात येऊन दर्शन दिले. प्रत्यक्ष देवानेच हा पेच प्रसंग सोडवला, मग डोळे नसतानाही प्रत्यक्ष राम दर्शन झाल्यामुळे त्या कारागीराने या अत्यंत देखण्या, भरीव मूर्ती घडवल्या. त्यामुळे सज्जनगडावरील या मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामाचे खरे प्रतिबिंबच जणू. आम्ही गेलो तेंव्हा रविवार असून सुद्धा उशीर झाल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही दोघे थोड्यावेळ तेथील गर्भगृहात बसलो आणि अजून काही, 'न भूतो न भविष्यती' अशा काही दैवी गोष्टी बघण्यास निघालो.



समाधी मंदिराच्या बाहेरच रामदास स्वामींचा मठ आहे. या मध्ये रामदास स्वामींच्या रोजच्या वापरातील काही गोष्टी जतन करून ठेवल्यात. या मध्ये कित्येक दैवी गोष्टी आहेत. जसे कि रामदास स्वामींना प्रत्यक्ष हनुमानाने दिलेले वल्कले तसेच गुरुदेव दत्तात्रेय यांनी दिलेली कुबडी, या कुबडी मध्ये हातभर लांब अशी धारदार तलवार आहे. तसेच या मठात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी समर्थांना भेट म्हणून दिलेला पलंग आहे. समर्थांचे यज्ञ कुंड, पिकदाणी, राम मूर्तींचा लाकडी कट्टा, तसेच अजूनही बऱ्याच वस्तू या ठिकाणी जतन करून ठेवल्यात. या सर्वांचे दर्शन घेऊन आम्ही भारावून गेलो. या ठिकाणी असलेली अजून एक अद्भुत वस्तू म्हणजे कल्याणस्वामींचे प्रचंड हंडे. एक हंडा म्हणजे आपला प्लास्टिकचा १०० लिटरचा ड्रम सहज भरेल. असे दोन हंडे घेऊन कल्याणस्वामी उरमोडी नदीतून प्यायला पाणी रोज घेऊन येत असत. हंड्यांचा आकार बघून मी हबकलोच. हंड्यांच्या आकारावरून समर्थांनी बलोपासनेचे सांगितलेले महत्व, त्यांनी राष्ट्र बळकटीसाठी स्थापन केलेले ११ मारुती आणि सर्व समर्थ शिष्यांच्या ताकदीची थोडीशी कल्पना आली.



मुख्य मंदिराच्या मागे समर्थ स्थापित धाब्याच्या मारुतीचे मंदिर तसेच ब्रम्हपिसा स्मारक आहे. या मंदिरांचे दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो, मंदिराच्या मागील परिसर अत्यंत नयनरम्य आहे. डोंगराच्या एका टोकाला धाब्याचा मारुती तर दुसर्या टोकाला उरमोडी धरण आहे. संपूर्ण गडाच्या सुरक्षिततेसाठी समर्थांनी या मारुतीची स्थापना केली होती. या ठिकाणी फोटोग्राफी साठी अत्यंत सुंदर वातावरण आहे. श्रीरामदास स्वामी संस्थानाच्या मार्फत आज या गडावर बरीच कामे केली आहेत या मध्ये प्रामुख्याने आहे ते गडावर राहण्याची तसेच २४ तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. गडावरील आणि आसपासचे वातावरण अत्यंत प्रसन्न आणि आल्हाददायक आहे. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणी सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूर्ण सज्जनगड आणि परिसरावर हिरवागार गालीचा अंथरल्या सारखे वाटते.









हा सर्व परिसर आम्ही डोळ्यात साठवून ठेवत होतो. गडावर फिरताना परतू नयेच असे वाटत होते. कितीही वेळ या ठिकाणी थांबलो तरीही आमचा पाय निघत नव्हता. पण अचानक ठोसेघर धबधब्याकडे जाण्याचा प्लान डोक्यात आला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो. माघारी जाताना अशोक वाटिका, तसेच किल्यावर असलेले अजून दोन तलाव पहिले. एका तलावात तर आम्हाला कित्येक कासवे आणि मासे पोहोताना दिसली.

मग आम्ही साधारणपणे साडेचारला गड उतार झालो. गडावर अजूनही कित्येक गोष्टी बघण्यासारख्या आहेत जसे कि कल्याणस्वामी कडा, अंगलाई देवी मंदिर इत्यादी. सज्जनगडाबद्दल कितीही लिहावे ते कमीच आहे.
सज्जनगडावर आलो आणि ठोसेघर धबधबा बघितला नाही असे होऊच शकत नाही; आणि हे अंतर सुद्धा अगदी 20 किमी च्या अंतरामध्ये आहे. मग साहजिकच आमची गाडी ठोसेघर कडे वळली. ठोसेघर धबधब्या विषयी आता पुढील लेखात सविस्तरपणे लिहीन.
धबधबा बघून आम्ही ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागलो. बराच उशीर झालेला. रस्त्यानेही खूप शेतकरी आपापल्या गाई-म्हशी आणि जनावरे घेऊन घरी परतत होती त्यामुळे रस्त्याने वेगाने जाता येत नव्हते. अंधारामुळे घरी यायला रात्रीचे १० वाजले. घरी परतताना पुढल्या मोहिमेचे बेत डोक्यात शिजत होते पण मन मात्र कधीच समर्थ चरणी लीन झालेले.