आजचा आमची भ्रमंती चा लेख लिहिताना मला विशेष आनंद होतो आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. एकतर आज खूप दिवसांनी भ्रमंतीचा योग आला आणि त्यात ती भ्रमंती झाली ती सुद्धा शिवकालीन ऐतिहासिक गावामध्ये. आज मी; आपल्याला फिरायला जायचे आहे एवढेच होम मिनिस्टरानां सांगतीले होते पण कोणते ठिकाण हे मात्र सांगायचे नाही असे ठरवले होते, त्यामुळे अनेकदा विचारून ही मी काहीच सांगत नाही हे पाहून कोणते तरी विशेष ठिकाण असणार हे तिच्या लक्षात आले. पुणे सातारा रस्त्यावर महामार्गाच्या दिशेने गाडी वळवली आणि गंमत म्हणून आपण आज बनेश्वरला जात आहोत असे सांगितले.
पण जेंव्हा गाडी कात्रज बोगदा ओलांडून शिवापुर - कोंढणपुर गावाकडे उजव्या दिशेला वळली तेंव्हा तिला लक्षात आले की आपण आज नवीन ठिकाणी भ्रमंतीला जात आहोत.
खरंतर आजचा बेत माझ्या डोक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून शिजत होता आणि त्याला कारण होते आमचे मित्र प्राध्यापक राजकुमार देशमुख सर. मागील महिन्या मध्ये देशमुख सर त्यांच्या पुरातत्व संशोधन ग्रुप बरोबर शिवकालीन जलस्त्रोतांच्या संशोधनासाठी या ठिकाणी गेले होते. त्यांच्या कडूनच मला या ठिकाणची माहिती मिळाली. खरे तर देशमुख सरांबद्दल बोलावे लिहावे तेव्हढे कमीच आहे. माझे हे मित्र म्हणजे अगदी आदर्श व्यक्तिमत्त्व, तांत्रिक, भौगोलिक, ऐतिहासिक, शिवकालीन इतिहास या सर्वांबद्दल प्रेम जिव्हाळा असणारा जाणता माणूस. सरांबद्दल नंतर एक विशेष लेख मी लिहिनच तेंव्हा आपण त्यांच्या बद्दल अजून जाणून घेऊयात. तर सरांनी सांगितलेले ते ठिकाण म्हणजे पाटलांचे रांझे गाव. याच ऐतिहासिक गावामध्ये जुन्या काळात पाटलाने गावातील एका मुलीला पळवून अत्याचार केला आणि भीतीने सर्व गावकरी मूग गिळून गप्प बसले. शिवरायांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी त्या पाटलाला शिताफीने पकडून आणले आणि त्याच्यावर खटला चालवून त्याचे हात पाय तोडले.
या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले पुरातन शिव मंदिर. याच शिव मंदिराला भेट देण्याचा बेत आज आखला होता. गावात पोहोचल्यावर रहदारी काहीच जाणवली नाही. बहुतेक सर्व लोक आपापल्या कामात किंवा शेतात गेले असावेत. एका घराबाहेर दोन तीन शाळेतील मुले थांबली होती त्यांना शंकराच्या मंदिराबद्दल विचारले. मंदिर गावातच अगदी जवळ होते. एका मोठ्या वाड्याला लागून असे हे मंदिर थोड्याशा खोलीत बांधलेले आहे. आतला सर्व परिसर भव्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इथे असलेली शांतता, घनदाट झाडी आणि स्वच्छ वातावरण. त्या काळात या मंदिराला चहू बाजूने तटबंदी असावी पण आज तिची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मुख्य मंदिर मात्र सुस्थितीत आहे. आता या ठिकाणी बघायचे मुख्य आकर्षण आणि ते म्हणजे येथे असलेली तीन शिवकालीन जलकुंडे. या जलकुंभाचे वैशिष्ट्य म्हणजे यांची अंतर्गत रचना.
असे म्हणतात की ही जलकुंडे अंतर्गतपणे जोडली गेलेली आहेत पण प्रत्येक कुंडात पाणी जाताना त्याचा रंग वेगळा आहे आणि पाणी शुद्ध होऊन पुढील कुंडात जाते. आम्हाला प्रत्येक कुंडात खूप सारे मासे आढळून आले. पहिले जलकुंड हे कपडे धुण्यासाठी वापरले जाते, दुसरे जलकुंड हे आंघोळी साठी वापरतात या दोन्हीचे पाणी गर्द निळे आहे, आणि तिसरे जलकुंड हे देवाच्या अभिषेक आणि स्नानासाठी वापरतात की ज्याचे पाणी हिरवे असून या मध्ये खूप बेडूक दिसून आले. पण पहिल्या दोन कुंडात एकही बेडूक दिसला नाही.
या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी निचरा होण्यासाठी केलेली योजना. इथे प्रत्येक ठिकाणी अंतर्गत गटारांची साखळी तयार केली आहे आणि जमिनीवर कोठेही पाणी पडल्यास जागोजागी दगडांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून दिली आहे. अशा प्रकारचे जलव्यवस्थापन हे फारच दुर्मिळ असून शिवरायांच्या कर्तृत्वाबरोबरच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याची चुणूक आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
आम्ही आलो त्या वेळी मुख्य मंदिराला कुलूप लावले होते त्यामुळे आम्ही प्रथम मंदिर परिसर फिरून बघितला, भरली वांग्याची भाजी आणि भाकरीची शिदोरी बरोबर होतीच त्यावर ताव मारला. आता पुढे काय हा प्रश्न सुचू देत नव्हता, आणि इतक्या लांब येऊनही दर्शन झाले नाही असे वाटू लागले. तितक्यात होम मिनिस्टर यांनी हा प्रश्न सोडवण्याचे कबूल केले आणि त्या मंदिराची किल्ली कोणाकडे ठेवतात ते बघायला गेल्या. तोपर्यंत मी माझे छायाचित्रे घेण्याचे काम करू लागलो.
या मंदिरामध्ये मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूस उंचीवर अजून दोन मंदिरे आहेत, तिथे जाऊन बघितले तर ही मंदिरे सुद्धा शंकरचीच होती. त्यातील एक मंदिर पूर्णपणे भग्नावस्थेत होते. यातील पिंड मात्र मुख्य मंदिरापेक्षा उंचीने मोठी होती. मंदिर परिसर अत्यंत आल्हाददायक आहे, आपल्याला अगदी एखाद्या हिरव्यागार पर्यटन स्थळी आल्यासारखा फील येतो. माझी फोटोग्राफी होई पर्यंत मंदिराची देखभाल करणाऱ्यानां होम मिनिस्टर घेऊन आल्या. शंकराचे दर्शन घेतले आणि त्या घाग मावशींकडून मंदिराची अजून माहिती घेतली. आजही गावातील पुरुष माणसे याच कुंडात रोज अंघोळीसाठी येतात तसेच गावातील बायका कपडे धुण्यासाठी येतात ही माहितीही मिळाली. दुष्काळात सुद्धा या तीन कुंडातील पाणी कधी कमी झालेले नाही.
खरेच आहे, जुने ते सोने म्हणतात ते उगीच नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आपण आजकाल आधुनिकतेच्या पाठीमागे हात धुवून लागलेलो आहोत पण जसे कितीही छान दिसले तरी कचकड्याचे खेळणे हे तकलादू असते त्याला लाकडी खेळण्याची सर येऊ शकत नाही तसेच पुरातन वास्तू, पुरातन कला, परंपरा, जीवन जगण्याची पद्धत आणि माणुसकी ही शंभर नंबरी सोन्याप्रमाणे असतात आणि हाच विचार मनात रुजवून आमचे मन शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले.
Tags - Ranje Village, Patlanche Ranje, Ranze
Tags - Ranje Village, Patlanche Ranje, Ranze
No comments:
Post a Comment