रामदरा

ऐन पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाच्या सरींवर सरी बरसत आहेत, सगळा निसर्ग ह्या वरुणराजाच्या कृपाशीर्वादाने तृप्त झाला आहे आणि अशा ह्या वातावरणात जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जावेसे वाटले तर टू व्हीलर काढायची आणि सुसाट निघायचे निसर्गाच्या कुशीत. त्याही दिवशी काहीसे असेच वातावरण होते, आभाळ भरून आले होते आणि आता आज कुठे जायचे याचा विचार चालू होता. काही केल्या ठिकाण ठरेना आणि वेळ तर असाच जात होता. मग अचानक एक ठिकाण आठवले आणि आम्ही लगेच निघालो. तसा निघायला आम्हाला बराच उशीर झालेला पण हे अगदी खासच ठिकाण आहे; पुण्यापासून अगदी जवळ.
चहूकडे हिरवळ, घनदाट झाडी, बाजूनेच सतत वाहणारा कालवा आणि तीन बाजूंनी डोंगराच्या कुशीत वसलेले हे ठिकाण म्हणजे "रामदरा"
 पुण्यापासून रामदरा खूपच जवळ आहे. रामदरा हे ठिकाण पुण्यापासून साधारणपणे ३० ते ३५ किमी अंतरावर लोणी काळभोर ह्या गावापासून जवळ आहे. आम्ही साधारणपणे दुपारी 1 वाजता घरून निघालो. सकाळपासून आभाळ भरून आल्यामुळे मूड जरा खराब होता आणि रामधरा ठिकाण अनोळखी असल्यामुळे मनात थोडीशी शंका होती कि हे ठिकाण कसं असेल. पुणे सोलापूर रस्त्याने सरळ काही अंतर गेल्यावर लोणी काळभोर हे गाव आहे. ह्या गावाकडे गाडी वळवली आणि रस्ता शोधत शोधत पुढे जाऊ लागलो. पुण्यातील गोंगाटा पासून अचानक मुक्ती मिळाली आणि मन हळूहळू प्रसन्न होऊ लागले. काही अंतर पुढे गेल्यावर वळणा वळणाचा रस्ता सुरु झाला आणि सिमेंटच्या जंगलांची जागा आता हिरवळीने घेतली. चहूकडे हिरवळ आणि हिरवीगार शेते लक्ष्य वेधून घेत होती. मधेच एखादे कौलारू घरटे आणि रस्त्याच्या कडेने निघालेले जनावरांचे कळप. थोड्याच अंतरावर झाडांची गर्दी दिसली आणि मंदिराचे कळस डोकावले. हेच ते रामदरा मंदिर. इथे बरीच नारळाची झाडे आहेत जी खूप दुरूनच दिसतात.


मंदिराच्या परिसरात जायला गेट मधून आत गेलो आणि गाडी पार्किंगला लावून मंदिराकडे निघालो. मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता तसेच दत्तात्रेय आणि शंकराची पिंड आहे. मंदिराचे सुशोभीकरण सध्या चालू आहे. त्यामध्ये मार्बल फ्लोअर आणि इतर काम चालू आहे. हे संपूर्ण मंदिर कृत्रिम तलावाने वेढलेले आहे. मुबलक पाण्यामुळे ह्या तलावात बाराही महिने पाणी असते. ह्या तलावात खूप रंगीबेरंगी बदके पोहत असतात. मंदिराच्या सभोवती वनखात्याने सुंदर विकासकामे केलेली आहेत. कित्येक प्राणी आणि पक्ष्यांची शिल्पे आणि माहितीपूर्ण बोर्ड ठिकठिकाणी लावले आहेत.



सर्व परिसर अत्यंत सुखावह आणि निसर्गरम्य आहे. रामदरा येथे आल्यावर सगळा थकवा दूर झाला आणि मूड एकदम बदलून गेला. आम्ही परिसराचे बरेच फोटो काढले आणि तिथल्या बागेत निवांत वेळ घालवला. ह्या बागेत वडाची आणि अशोकाची बरीच झाडे आहेत. एकूणच सर्व परिसर हिरवागार आहे.




संपूर्ण परिसर फिरायला साधारणपणे अर्धा ते एक तास पुरेसा आहे. मंदिर परिसर धार्मिक आहे, पण ह्या वातावरणात बऱ्याच ठिकाणी वयात आलेली मुलं मुली एकमेकांबरोबर नको ते चाळे करताना सर्रास दिसतील. कुटुंबातील थोरामोठ्यां बरोबर आलेल्या लहान लेकरांच्या पुढेच त्यांचे हे कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे रामदरा इथे जाताना शक्यतो सकाळीच जावे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची हि कर्तृत्ववान भावी पिढी त्यावेळी साखरझोपेत असेल.


रामदरा या ठिकाणी खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. इथे काही स्थानिक लोकांनी छोट्याश्या झोपडीमध्ये दोन चुलींवर गरमागरम जेवण देण्याची सोय केली आहे. इथे चुलीवरची पिठलं भाकरी आणि कांदा, तसेच चविष्ट भजी, चहा इत्यादी गोष्टी मिळतात. दर्शन होऊन संपूर्ण परिसर फिरून झाल्यामुळे मग आम्ही सुद्धा इथल्या जेवणावर यथेच्छ ताव मारला. चुलीवरील भजी तर अप्रतिम होती. मंदिराबाहेर स्थानिक भाजी विक्रेते ताजी भाजी घेऊन बसले होते तेथून आम्ही भाजी घेतली आणि पुण्याकडे प्रस्थान केले परत एकदा माणसांच्या गर्दीत मिसळण्यासाठी.

श्री कानिफनाथ गड, बोपदेव

मागील लेखामध्ये आपण भुलेश्वर येथील आमची भ्रमंती अनुभवली. भुलेश्वरच्या रस्त्यावरच आम्ही अजून एका तपोभूमीचे दर्शन घेतले आणि ते म्हणजे कानिफनाथ गड. बहुतेक जणांना या तीर्थक्षेत्राची थोडीफारच माहिती आहे. आज आपण आमच्या याच भ्रमंती विषयी जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले, कित्येक पंथ या पवित्र भूमीत उदयाला आले. याच संतांच्या भूमीत एक पंथ उदयाला आला आणि तो म्हणजे नाथपंथ. नाथपंथाची स्थापना साधारणपणे आठव्या शतकात गुरु दत्तात्रेय यांच्या कृपाशीर्वादाने झाली. असे म्हणतात कि भगवान शंकरांनी ह्या पंथाची स्थापना केली. मच्छिंद्रनाथ हे या नाथपंथातील पहिले नाथ. त्यानंतर गोरक्षनाथ आणि मग कानिफनाथ असा या पंथाचा उदय होत गेला आणि एकूण नऊ नाथ आता पर्यंत झालेले आहेत.

कानिफनाथ गडावर याच कानिफनाथांनी बरीच वर्ष तपसाधना केली असे म्हणतात. कानिफनाथ गड हे ठिकाण पुणे सासवड ह्या मार्गावर बोपदेव या गावानजीक आहे. रविवारी बऱ्याच महिन्यानंतर सुट्टी मिळाल्याने आम्ही भुलेश्वरला जाण्याचा बेत आखला होता. पण या रस्त्याने जाताना अजून एक तीर्थक्षेत्र आहे हे मला माहित होते ते हेच कानिफनाथ गड. त्यामुळे कानिफनाथाला हि आपण जायचे हा मी मनोमन प्लान केला पण होम मिनिस्टरांना या बद्दल काहीही माहित नव्हते. पुण्यापासून बोपदेव घाट मार्गे आम्ही बोपदेव ह्या गावी आलो आणि तेथून मुख्य रस्ता सोडून डावीकडे असलेल्या भव्य कमानीतून गाडी आत वळवली. होम मिनिस्टरांना माझ्या या प्लान बद्दल माहिती नसल्याने सुरुवातीला काही लक्षात आले नाही पण कानिफनाथाच्या रस्त्यावरची भव्य कमान बघताच तिलाही खूप आनंद झाला.
बोपदेव हे गाव छोटे असले तरी हा संपूर्ण रस्ता चांगला आहे. रस्त्यालाच बरेच शेतकरी पुण्यावरून येणाऱ्या लोकांसाठी भाजीपाला विक्रीला घेऊन बसले होते. मुख्य कमानीतून काही अंतर गेल्यावर गड दृष्टीपथात आला आणि आम्ही फोटोग्राफी करत करत गडावर जाऊ लागलो.  


हा गड तसा उंचीवरचा आणि रस्ता वळणावळणाचा. पहिले वळण पाहिले आणि लोहगडाच्या रस्त्याची आठवण होऊन अंगावरती काटाच आला (लोहगडाच्या भ्रमंतीमध्ये हे सविस्तर सांगणारच आहे). गाडीचा पहिलाच गियर टाकावा लागला आणि हळूहळू आम्ही वरती जाऊ लागलो पण कानिफनाथ गडाचे हे एकच अवघड वळण आहे. बाकी घाट रस्ता सोपा आहे.

गडावर पोहोचल्यावर पार्किंगची चांगली सोय आहे तसेच मुख्य मंदिरापर्यंत गाड्या जाऊ शकतात. आम्ही खालच्याच पार्किंग मध्ये गाडी लावून पायऱ्या चढून वर गेलो. गडावर बरीच दुकानेही आहेत. यामध्ये धूपापासून ते भेळ, वडापाव, जेवण इत्यादी सर्व सोय आहे. मुख्य मंदिर हे गडाच्या सर्वोच्च उंचीवर असून आजूबाजूचा सर्व परिसर येथून सहज दिसतो. मंदिराचे बांधकाम आताच्याच काळातले आहे. भव्य मंडप, आजूबाजूला मोकळी जागा आणि अत्यंत सुंदर आणि महत्वाचे म्हणजे स्वच्छ परिसर हे या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य.

आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि आश्चर्याने अचंबित झालो. कारण होते ते कानिफनाथाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारचे. गाभाऱ्यात जाण्यासाठी एक फारच अरुंद चौकोनी खिडकी समोर दिसत होती आणि त्या खिडकीच्या आता एक भव्य गाभारा असून आता ८ ते १० माणसे सहज मावतील एवढी जागा आहे. मात्र गाभाऱ्यातून आत जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी माणसाला सरपटत जावे लागते. एखाद्या ढेरीवाल्या जाड माणसाला या गाभाऱ्यात जाणे अशक्य आहे.



गाभाऱ्यात फक्त पुरुष भक्तांनाच प्रवेश आहे आणि तो हि शर्ट काढूनच. स्त्रियांना फक्त पादुकांचे दर्शन घेण्याची परवानगी आहे. दर्शन घेऊन आम्ही सगळा मंदिर परिसर फिरून बघितला. गडावरचे वातावरण अत्यंत धार्मिक, प्रसन्न आणि आध्यात्मिक वाटले. परिसरात मुख्य मंदिरा बरोबरच इतर अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच गडावर एक अप्रतिम शिल्पही बसवले आहे, ते शिल्प म्हणजे कानिफनाथाच्या जन्माचा देखावा. ह्या शिल्पात एक अजस्त्र हत्ती असून त्याच्या कानातून मच्छिंद्रनाथ, कानिफनाथाला बाहेर काढत आहेत आणि शेजारीच शंकर आणि विष्णू भगवान सर्वांना आशीर्वाद देत आहेत. या ठिकाणी खूप जण सेल्फी काढत होती त्याच गर्दीत मग आम्हीही सामील झालो. 


मंदिर परिसर बघून आम्ही प्रसादगृहात जाऊन प्रसाद घेतला. हा प्रसाद नसून पूर्ण जेवणच होते असे म्हणायला हरकत नाही. दररोज दुपारी १२ नंतर प्रसाद सुरु होतो. आपली थाळी आपण स्वतः घ्यायची आणि धुवून पण ठेवायची असा इथला नियम आहे. प्रसादामध्ये शिरा, भात आणि कुर्मा भाजी मिळाली. उत्तम नियोजन, स्वच्छता आणि धार्मिक वातावरण यामुळे पोट आणि मन तृप्त झाले.
कानिफनाथांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या मंगल भूमीचे दर्शन घेऊन आम्ही भुलेश्वराकडे रवाना झालो.

भुलेश्वर


पुण्याच्या आसपास भटकंती करायची असेल तर कित्येक ठिकाणे आपल्याला साद घालत असतात. माझ्या कॉलेजमुळे आणि प्रवेश प्रक्रिया आणि इतर अनेक कारणांमुळे रविवारी फारच कमी वेळा सुट्टी मिळते. आणि अशीच दैव योगाने म्हणा किंवा नशिबाने तब्बल दीड ते दोन महिन्यांनी सुट्टी मिळाली आणि सुट्टीची बातमी मिळताच भटकंतीचे बेत घरात शिजायला लागले. तस बघायला गेले तर इतकी वर्ष पुण्यात घालवल्यामुळे आसपासची कित्येक ठिकाणे बघून झालेली त्यामुळे आता कुठे तरी नवीन ठिकाणी जाण्याचा बेत डोक्यात होता आणि इंटरनेट वर सर्च करताना कित्येक नवनवीन ठिकाणाची माहितीही मिळत होती.
या मध्ये एक ठिकाण काही खासच होते ज्याने माझे लक्ष्य कित्येक दिवसांपूर्वीच वेधून घेतलेले आणि ते म्हणजे आठव्या शतकातील अतिप्राचीन असे महादेवाचे मंदिर “भुलेश्वर”. बस ठरलं तर, आता उद्या जायचे तर याच ठिकाणी. होम मिनिस्टर तर जाण्याच्या तयारीला लागल्या सुद्धा. मी अगोदरच इंटरनेट वरून बाकीची माहिती पाहत होतो त्यावेळी समजले कि हे मंदिर प्राचीन असून अजूनही सुस्थितीत आहे आणि या मंदिराच्या भिंतींवर बरीच कोरीव काम असलेली शिल्पे आहेत. शेवटी इथेच जाण्याचे फायनल केले.

सकाळी लवकर म्हणजे सहाला उठून घरातून ८ पर्यंत निघण्याचे ठरवले आणि नेहमी प्रमाणे ८ ला उठून ११ ला घरातून बाहेर पडलो. भुलेश्वर हे ठिकाण सासवड जवळील माळशिरस या गावाजवळ आहे. हे माळशिरस (भुलेश्वर) असून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस हे वेगळे आहे. भुलेश्वर हे ठिकाण पुण्यापासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर द्रुतगती मार्गावर यवत गावानजीक आहे. याठिकाणी जाण्यासाठी पुणे-सासवड व्हाया बोपदेव घाट हा सुद्धा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. सासवड ते भुलेश्वर हे अंतर ३० किलोमीटर असून रस्ता चांगला आहे. ह्या दोन्ही मार्गांपैकी आम्ही बोपदेव घाटातून जाण्याचे निश्चित केले आणि त्याला कारणही होते ते म्हणजे ह्या मार्गावरची कमी वर्दळ, रस्त्यांनी असणारी झाडे हिरवळ आणि सुंदर असा बोपदेव घाट. ऐन पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा आज मात्र पावसाने जरा उघडीप दिली होती आणि त्यामुळे आमचा प्रवास आमच्या passion वर मजेत चालू होता. पुण्यापासून बोपदेव घाट सुरु होईपर्यंत गर्दी जास्त होती आणि घाट सुरु झाल्यानंतर रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला आणि आमच्या गाडीचा वेग वाढला. बोपदेव घाटामध्ये एक-दोन अवघड वळणे आहेत ज्या ठिकाणी गाडी मारताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. पण घाट रस्ता अत्यंत सुरक्षित असून रस्त्याची रुंदीही जास्त आहे. घाट चढून वर पोहोचल्यावर थोड्याच वेळात बोपदेव गाव येते आणि येथे आहे अजून एक तीर्थक्षेत्र ते म्हणजे “श्री कानिफनाथ यांची समाधी”. भुलेश्वरच्या रस्त्यावरच असल्यामुळे आम्ही कानिफनाथाचे दर्शन घेऊन पुढे जाण्याचे ठरवले आणि मग सासवड कडे रवाना झालो. कानिफनाथाच्या मंदिरा विषयी आणि आसपासच्या परीसरा बद्दल बरेच लिहिण्या सारखे आहे जे मी नंतरच्या लेखामध्ये सविस्तरपणे लिहीन. तर मग कानिफनाथाचे दर्शन घेऊन आम्ही सासवड मधून माळशिरसकडे जाण्यासाठी रवाना झालो.
थोडे पुढे गेल्यावर एक छोटेशे गाव लागले आणि त्या गावाचे नाव बघून आम्हाला फारच आश्चर्य वाटले. जणू आम्ही भारतात असूनही एका दुसऱ्याच देशात आलेलो आणि ते गाव म्हणजे “सिंगापूर”. ते तिकडे मलेशिया मधील आधुनिकीकरण झालेले सिंगापूर आणि इकडे डोंगर कुशीत निसर्गरम्य आपले सिंगापूर; आणि गावाची पाटी बघून मनात विचार चमकून गेला कि चला आता आमच्या ह्यांना सांगावे कि बघ मी तुला घेऊन आलो सिंगापूरला!!! पण हे ऐकून होम मिनिस्टर यांना गम्मत वाटण्यापेक्षा वाईट वाटेल हा विचार जास्त प्रकर्षाने जाणवला आणि गप्प बसलो. मात्र परतीच्या वाटेने येताना एक सेल्फी गावाच्या पाटीबरोबर घेतलाच.



माळशिरस पासून भुलेश्वरला जाण्यासाठी डावीकडे एक रस्ता जातो. ह्या रस्त्याने साधारणपणे ४ किलोमीटर थोड्याश्या कच्च्या रस्त्याने आपण भुलेश्वरच्या चरणी पोहोचतो. भुलेश्वर चे मंदिर आपल्याला बरेच लांबून दिसते कारण हे मंदिर एका पुरातन अशा दौलत मंगळ ह्या किल्ल्यावर वसवलेले आहे. भुलेश्वराच्या पायथ्यापासून पुढे गडावर जाण्यासाठी एक छोटासा घाट रस्ता आहे. ह्या रस्त्याची रुंदी बरीच कमी आहे. समोरासमोर दोन मोठ्या गाड्या आल्यास नवशिक्या ड्रायव्हरची भंबेरी ह्या ठिकाणी उडू शकते. घाट संपताच किल्य्याचा भग्नावस्थेतील बुरुज आपले स्वागत करतो. या नंतर एका रस्त्याने गाड्या अजून मंदिराजवळ जातात तर दुसऱ्या रस्त्याने पायऱ्या चढून मंदिरात जाता येते.


आता थोडेसे मंदिराबद्दल; शंकराचे हे पुरातन मंदिर ८ व्या शतकातील असून बाहेरची भिंत हि १२ व्या शतकात बांधण्यात आली. मुख्य मंदिर हे पृष्ठभागापासून थोडे उंचीवर वसवले आहे. १८ व्या शतकात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांचे गुरु व सातारचे शाहू यांचे गुरु श्री ब्रम्हेंद्र स्वामी यांनी केला. त्यावेळी त्यांनी मंदिरावरील तीन शिखरे, मंदिरासमोरील सभा मंडप व त्यावरील नगारखाना यांचे बांधकाम केले. आजची हे सर्व सुस्थितीत आपल्याला बघायला मिळते. मंदिरापुढे एक मोठी पितळी घंटा आहे, आणि समोरून आत जाण्याचा मार्ग आहे. परंतु मंदिरात समोरून पाहिल्यास आपल्याला एक छोट्या मारुतीची मूर्ती दिसते. आणि ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजूनी दोन दगडी मार्ग वरच्या मजल्यावर आपल्याला घेऊन जातात. आणि वर गेल्यावर आपल्याला आत मध्ये असणारे खरे मंदिर दिसते. ह्या आतील मंदिरापुढे एक सुंदर कोरीवकाम केलेला विशाल असा नंदी असून त्याचे तोंड मात्र थोडेसे वळलेले आहे. ह्याचे कारण मात्र मला समजले नाही. 

नंदीच्या पुढे आतील बाजूस शंकराची पिंड आहे. आम्हाला तर कधी एकदा दर्शन घेऊन मंदिराचे कोरीवकाम बघतो असे झाले होते. संपूर्ण मंदिराच्या भिंतींवर सुरेख कोरीवकाम केलेलं आहे, परंतु मुस्लीम आक्रमणामुळे ह्या मंदिराचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास सर्व मूर्तीची तोडफोड झालेली आहे. तरीही काही मूर्ती ज्या उंचीवर आहेत त्या सुस्थितीत आहेत. या मंदिराच्या बाहेरील तटबंदी मध्ये ध्यानधारणा करण्यासाठी छोट्याश्या दगडी खोल्याही आहेत. अश्या ह्या सुंदर मंदिराबाहेर पटांगणही भव्य आणि सुंदर आहे. लहान मुलांना खेळायला खूप सारी ऐसपैस जागा आहे.




ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला असलेले ३ कळस. हे हेमाडपंथी असून अत्यंत सुंदर आहेत. परंतु डागडुजी करताना कळसाला पिवळा रंग दिल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी झाले आहे. आम्ही ह्या मंदिरात आलो त्यावेळी साधारण दुपारचे ३ वाजले होते आणि थोडीफार वर्दळही होती. दर्शन घेऊन आम्ही सर्व परिसर फिरून कॅमेरात कैद केला आणि परतीच्या वाटेला लागलो. इतक्या पुरातन काळी तिथे कोणी शिवलिंग स्थापन केले माहित नाही पण ह्या शिवलिंगाच्या साक्षीने कित्येक योगी बैरागी आणि भक्तगण ह्यांनी ह्या तपोभूमीत पुण्य पदरी साठवले असेल. आजच्या ह्या कलियुगात मोबाईल, टीव्ही, इंटरनेट आणि इतर भौतिक सुखांच्या मागे लागलेल्या नवीन पिढीला हा भुलेश्वर योग्य मार्ग दाखवो........ हीच त्या भुलेश्वर चरणी प्रार्थना.
परतीच्या प्रवासात घराची ओढ लागलेली पण मनात मात्र भुलेश्वराचे मंदिर आणि तिथला परिसर घोळत होता. संध्याकाळी घरात पाउल टाकले आणि पुढच्या भटकंतीचा प्लान डोक्यात सुरुही झाला.........